महाराष्ट्रातील अतिउच्च शिखर म्हणजे कळसूबाई. सुमारे 1,646 मीटर (5,400 फीट) उंचीवर असलेले कळसुबाई हे एक नयनरम्य ठिकाण आहे.एका सामान्य व्यक्तीला चढण्यासाठी सुमारे तीन साडेतीन तासाचा वेळ लागू शकतो चालण्याच्या गतीवर आणि घेतलेल्या थांब्यावरून जर वेळ मोजायचा म्हटलं तर चार तास सहज लागतील .. बारी गावातून सुरू झालेल्या ट्रेक ची मजा आणि एक्सायटमेंट प्रचंड होती. ज्या सर्वांना कळसूबाई सर करता येत नाही अशा मंडळींसाठी कळसूबाईच्या पायथ्याशीच एक कळसूबाईचं मंदिर बांधलं गेलं आहे. पायथ्याशी म्हणजे जिथवर जाई पर्यंत सुद्धा चांगलीच दमछाक होते. ती दमछाक झाल्यावर आपण कळसूबाई शिखर चढू शकू का? अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्या शिवाय राहत नाही. पण जर कळसूबाईच्या पायथ्याशी येऊन शिखर चढले नाही तर कदाचित थ्री इंडियट मधील डायलॉग आठवल्या शिवाय राहणार नाही " थोडी हिम्मत की होती तो लाईफ कुछ और होती" म्हणून थोडी हिम्मत दाखवून कळसूबाई शिखर चढायचंच ठरवलं, नाही शकलो तर तिथून माघार घेऊ पण शिखर चढण्याचा प्रयत्न नक्की करायचा आणि तिथूनच खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली .
मनात धाक धूक होतीच . पण सोबत असलेला सर्वच मोटिवेटेड सहकार्यामुळे मार्गक्रमण सुरु झाले. 'फक्त एक पाऊल पुढे टाकायचं' याच एका ओळीवर लक्ष खिळवून ठेवलं. जाताना अर्धा अर्धा किलोमीटर अंतरावर लिंबू सरबताचे स्टॉल असल्याकारणाने एनर्जी मिळावी म्हणून एकदा लिंबू सरबत पिऊन पुन्हा चढायला सुरुवात केली . जाताना लागलेली झाडी, निसर्गरम्य दृश्य अतिशय लोभस होते पण या लोभसवान्या दृश्याकडे लक्ष थोडे कमीच होते, कारण कळसुबाई शिखर चढण्याची ओढ होती.कळसूबाई च्या पायथ्याला राहणाऱ्या लोकांचे कळसूबाई हे कुलदैवत. त्यामुळे कुलदेवतेच्या दर्शनासाठी भाविक लहान लहान मुले घेऊन कळसूबाई गड अतिशय सहजतेने सर करत होती. आश्चर्याची गोष्ट ही की गडावर राहणारी लोक गडाखालून सामानाचा एवढं ओझ आणून दुकान थाटात होती.मग त्यांचे हे परिश्रम बघता आपण दुकानातून काही घेतल्यास जास्त पैसे देण्यास त्रास वाटला नाही कारण एक व्यक्ती काहीही ओझ नसताना कळसूबाई चढण दमछाक करणार होत तर हे लोक तर सामानाचा ओझ्या सोबत कळसुबाईच्या मार्गावर आपली दुकान थाटतात. लिंबू सरबतासाठी लागणारे एक हंडा पाणी असो किंवा पर्यटकांसाठी काही खाण्याच्या वस्तू वर घेऊन जाणं असो हे दोन्हीही दमछाक करणारच होतो. ट्रेकिंगला जाण्यासाठी लागणारा सर्व लवाजमा जसं की ट्रेकिंग शूज स्टिक्स सगळं काही घेऊन आम्ही कळसुबाईच्या शिखरावर चढत होतो मात्र रस्त्यात अगदी पायात चप्पल न घालता कळसुबाई सर करणारे लोकही आम्ही पाहिले. हळूहळू गड सर करत वरवर जात असतानाचा आनंद अगदी वेगळा होता.
सरते शेवटी कळसुबाईच्या मंदिराजवळ पोहोचतात कळसुबाईचे मंदिर असल्याकारणाने कळसुबाई च्या मंदिरात नारळ फोडणे ओटी घेणे हा मोह आवरला नाही नारळ घेण्यासाठी ज्या व्यक्तीकडे आम्ही गेलो त्या व्यक्तीची नारळ संपली होती, तर त्याने आम्हाला सांगितले नारळ आणण्यासाठी एक व्यक्ती खाली गेला आहे तो आता येईल. आम्हाला वाटलं नारळ आणणे म्हणजे किमान दहा एक नारळ तो घेऊन येईल. आम्ही नारळाची वाट बघत थोडा वेळ गडावरच मंदिराजवळ थांबलो आणि थोड्या वेळाने नारळ घेऊन व्यक्तीसमोर आला. पाहिलं तर काय 50 नारळांचं एक मोठं पोतं घेऊन ती व्यक्ती गडाच्या खालून वरपर्यंत ते पोतं उचलून घेऊन आली होती आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला आम्ही पाठीवरील ओझं घेऊन सुद्धा गडावर व्यवस्थित न चालता येणारे आम्ही, आणि ती व्यक्ती पन्नास नारळांचं पोतं घेऊन सहजपणे गड चढून आली होती. तेव्हा नारळासाठी दिलेले 50 रुपये देखील कमीच वाटले. गडाखाली असताना वर कळसुबाईला नारळ घ्यावं असा विचार करून आम्ही नारळ घेतले परंतु बॅगमध्ये ओझे होईल म्हणून ते नारळ पुन्हा कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात फोडून तिथेच खाऊन वर जाण्यासाठी निघालो होतो, आणि या व्यक्तीने 50 नारळांचे पोतं त्याच पायथ्यापासून गडावर आणल्यानंतर आम्ही त्या व्यक्तीकडे आ करून बघतच राहिलो. गडावर येताना झालेल्या दमचाकीमुळे आम्ही कळसुबाईच्या मंदिराजवळच अर्धा ते पाऊण तास बसून राहिलो आणि त्यानंतर परतीच्या प्रवासास निघालो परतीचा प्रवास करताना एनर्जी खूपच डाऊन झाल्याचे जाणवले त्यामुळे तेथील एका दुकानावर जाऊन खाण्याचे काही मिळेल का याची चौकशी करून तेथे सर्वांनी पोटभर मॅगी खाल्ली आणि तेथे आणखी अर्धा तास घालवला. जवळच असलेल्या एकमेव विहिरीचे पाणी शेंदून काढून पाणी प्यालो आणि नंतर पुन्हा गड उतार झालो. गड उतार होताना प्रवास आणखीनच जोखमीचा आहे असे वाटत होते परंतु अतिशय सावकाश आणि सावधगिरीने गड उतार होत होतो. आणि कळसुबाई चढून आल्याचं समाधान मनात होते त्यामुळे परतीच्या प्रवासाचा म्हणावा असा त्रास जाणवला नाही, सर्वांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसत होता.