एक होते सुंदर सरोवर. त्या
सरोवरापासून थोड्याच अंतरावर एक खूप मोठे झाड होते. त्या झाडाच्या उंच फांदीवर एक
घरटे होते. त्या घरट्यात कावळ्याचे जोडपे राहत होते. ते खाऊन पिऊन सुखी होते. त्या झाडाच्या खोडामध्ये एक ढोली होती. त्या
ढोलीत एक काळा साप राहत होता.
त्या झाडावर आणखीही बरेच पक्षी
राहत असे. या पक्षांच्या छोट्या छोट्या पिल्लांना काळा साप खाऊन फस्त करत असे आणि
धष्टपुष्ट राहत असे. एके दिवशी कावळीणीने घरट्यात अंडी घातली. काही काळानंतर त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडली. कावळा आणि कावळीणीला खूप आनंद झाला.
कावळीण तर पिल्लांपासून क्षणभरसाठी
सुद्धा दूर जात नव्हती. कावळासुद्धा पिल्लांची खूप काळजी घेत होता. सरोवराच्या आसपास खेळणाऱ्या
दांडगट मुलांपैकी एखादा मुलगा जरी झाडाजवळ आला, तरी कावळा लगेच काव..काव.. करू
लागे आणि त्याला चोच मारून दूर पळवून लावी.
एकदा कावळा दाणे टिपण्यासाठी बाहेर गेला होता. पिल्ले खूप भुकेलेली होती आणि काव-काव करून रडत होती. कावळीणीने विचार केला की, जवळच काही चारा मिळाला तर तो चोचीत भरून घेऊन यावा आणि भुकेल्या पिल्लांना भरवावा! असा विचार करून कावळीण घरट्यापासून काही क्षण दूर गेली.
इतक्यात काळा नाग ढोलीतून बाहेर पडून झाडावर
चढला. तो कावळ्याच्या घरट्यापाशी
पोचला आणि त्याने कावळ्याच्या पिल्लांना खाऊन
टाकले. कावळीन पिल्लांसाठी चोचीत
चारा भरून घेऊन परतली, तेव्हा घरट्यामध्ये पिल्ले नव्हती !ती आक्रोश करू लागली.
त्याच वेळेस कावळा सुद्धा चोचीमध्ये दाणे घेऊन तेथे पोचला. कावळीन मोठ्या-मोठ्याने
रडत त्याला म्हणाली, “त्या काळ्या सापाने आपल्या सर्व पिल्लांना खाल्लं हो...”
ते दोघेही मोठ्या-मोठ्याने रडू लागले. त्यांचा आक्रोश ऐकून इतर कावळेसुद्धा उडत उडत तेथे आले. हकीकत ऐकून कावळे विलाप करू लागले. काही वेळानंतर सर्व कावळ्यांनी त्या दोघांचे सांत्वन केले – ‘जशी ईश्वराची इच्छा.’ मग ते सर्व कावळे उडून गेले.
कावळीण कावळ्याला म्हणाली,
“काहीही करा; पण या काळ्या सापाला ठार मारा. त्याने आपल्या पिल्लांना खाल्ले आहे.”
कावळा म्हणाला, “पण हा काळा साप तर खूपच शक्तिशाली आहे. त्याला ठार मारणं हे काम आपल्याच्यानं
होणार नाही.” कावळीण म्हणाली, “शक्तीने
नाही तर युक्तीने काम करावं लागेल.
एक कोल्हा आपला मित्र आहे ना ! तो यावर नक्कीच
उपाय सुचवेल.” कावळा लगेच उडत उडत
कोल्हयाकडे गेला. कोल्हयाने कावळ्याची सर्व हकीकत ऐकली आणि मग काळ्या सापाला मारण्याचा उपाय त्याला सांगितला. कावळा उडत उडत घरट्यात परतला आणि त्याने
कावळीणीला तो उपाय सांगितला, तो ऐकून कावळीण उत्साहित झाली.
कावळा आणि कावळीण उडत उडत
सरोवरापाशी आले. त्यांनी पाहिले की, त्या सरोवरातकोणी महाराणी स्नान करत आहे.
त्या सरोवराच्या किनारी महाराणीची वस्रे आहेत !वास्राजवळ सोन्याचे दागिने आहेत !
ते उन्हाळ्यामध्ये चमचम चमकत होते. तेथे होते सोन्याचे व अस्सल मोत्यांचे हार! कावळीन झपाट्याने खाली उतरली.
तिने आपल्या चोचीने मोत्यांचा हार उचलला आणि लगेच आपल्या झाडाच्या दिशेने भरारी मारली. कावळासुद्धा तिच्या मागोमाग उडू लागला.
राणीच्या सैनिकांपैकी एका
सैनिकाची नजर त्या कावळीनीवर पडली. तो मोठ्याने ओरडला; तेव्हा सर्व सैनिक हातात
काठ्या घेऊन त्या उडणाऱ्या कावळ्यांच्या मागोमाग धावू लागले. कावळीणीने मोत्याचा हार त्या
काळ्या नागाच्या ढोलीत टाकला आणि ती उडून दूर निघून गेली. राणीच्या सैनिकांनी हे
पहिले.
सैनिक त्या झाडाजवळ आले.
त्यांच्यापैकी एका सैनिकाने आपली काठी त्या ढोलीमध्ये घुसवली. त्यासरशी क्रुद्ध
काळ्या सापाने आपला फणा ढोलीतून बाहेर काढला. तेव्हा सैनिकांनी काळ्या सापावर
काठीने प्रहार करायला सुरुवात केली. साप थोड्याच वेळात मरण पावला. मग ते सरोवराकडे
रवाना झाले.
अशाप्रकारे काळा साप मरण पावला.
त्यामुळे कावळा व कावळीणीला आनंद झाला. ते आनंदाने काव-काव करू लागले.