मराठी बालगीते लिरिक्स
एक होती इडली...
एक होती इडली
ती होती चिडली
धावत धावत आली
सांबारात बुडाली
सांबर होते गरम गरम
इडली झाली नरम नरम
चमचा आला खुशीत
जाऊन बसला बशीत
चमच्याने पहिले इकडे तिकडे
इडलीचे केले तुकडे तुकडे
इडली होती फारच मस्त
आम्ही मुलांनी केली फस्त...
एक होती सुई...
एक होती सुई
तिच्या मागे सदाघाई
दोरा घेऊन धावायची
भर भर कपडे शिवायची
एकदा सुई कंटाळली
सतरंजीवर झोपी गेली
सुईवर पडला ताईचा पाय
ताईने केले हाय - हाय
सुईला वटली भीतीच फार
ताई आता देईल मार
पटकन उठली, दोऱ्यात घुसली
कपाटात जाऊन, गुपचुप झोपली !!!
छान छान छान...
छान छान छान
मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान
इवलीशी जिभली नि इवलेसे दात
चुटू चुटू खाते कसा दूध आणि भात
इवले इवले डोळे इवले इवले कान
छान छान छान
मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान
इवल्याशा पायामधे इवलासा चेंडू
फेकीता मी घ्याया धावे दुडू दुडू दुडू
इवल्याशा शेपटीची झाली कमान
छान छान छान
मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान
आली आली मनीमाऊ दूर जरा जाऊ
बाळाची मजा सारी दुरुनिया पाहू
आईशी बाळ खेळे विसरूनी भान
छान छान छान
मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान...
Also read : शालेय विद्यार्थ्यांसाठी 10 उत्तम निबंध
मराठी महिन्यांचे गाणे...
चैत्र महिना येतो पहिला
गुढी उभारू स्वागताला
वैशाख महिना खूप उन्हाचा
तापलेल्या सूर्याचा
जेष्ठ महिन्यात पाऊस येई
आनंदाचे गाणे गाई
आषाढ विठूरायामध्ये दंग
सगळे मिळून गाती अभंग
श्रावणात सजला निसर्ग सगळा
सणावारांचा असे सोहळा
भाद्रपदात बाप्पा येती
मिळून सगळे करू आरती
आश्विन मध्ये दसरा दिवाळी
लांबच लांब दिव्यांच्या ओळी
कार्तिक महिन्यात पौर्णिमा त्रिपुरी
दिव्यांची आरास घरोघरी
मार्गशीर्षात येई थंडी
घाली स्वेटर, कानटोपी, बंडी
पौष महिना संक्रांतीचा
तिळगूळ देण्या - घेण्याचा
माघ हसवतो निसर्गाला
नवी पालवी देई झाडाला
फाल्गुन महिन्यात सण होळीचा
गोड गोड पुरणाच्या पोळीचा
असे हे बारा महीने मराठी
निसर्गासोबत बदलत राहती
सणवारांची गुंफण घालू
निसर्ग जपू नि साजरा करू!
भाज्या घ्या हो...
भाज्या घ्या हो...
भाज्या घ्या!
मंडईत आल्या भाज्यांच्या गाड्या
भाज्यांनी मारल्या पटपट उड्या
भाजीवाल्या काकांनी ठोकली आरोळी
भाज्या घ्या हो
भाज्या घ्या!
हिरव्या स्वेटरमध्ये बिलगून बसले
इटूकले पीटुकले मटारचे दाणे
एका सूरात म्हणती सारे
भाज्या घ्या हो
भाज्या घ्या!
गुबगुबीत फ्लॉवर दिसतोय कसा
पांढरा शुभ्र ढगोबा जसा
खुदुखुदु हसत म्हणतो कसा
भाज्या घ्या हो
भाज्या घ्या!
जांभळ्या रंगाची घातली बंडी
डोक्यावर हिरवी, वाकडी शेंडी
डूलत डूलत गातात वांगी
भाज्या घ्या हो
भाज्या घ्या!
एकावर एक सांभाळून थोड्या
पालेभाज्यांच्या बसल्या जुडया
तोल सावरत म्हणतात कश्या
भाज्या घ्या हो
भाज्या घ्या!
बाजू बाजूला टोपल्यांत मांडल्या
लाल लाल गाजर नि कोवळ्या काकड्या
हसत खेळत गातात सोबत
भाज्या घ्या हो
भाज्या घ्या!
कोपऱ्यात होते निवांत बसून
कांदे, बटाटे, टोमॅटो, लसूण
त्यांना विसरून चालेल कसं?
भाज्या घ्या हो
भाज्या घ्या!
ताज्या भाज्या खाल जेव्हा
भरपूर ताकद मिळेल तेव्हा
म्हणून बाळांनो, सांगतो तुम्हाला,
भाज्या खा हो भाज्या खा!